१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर श्रीकृष्ण आयोग गठित करण्यात आला होता; परंतु तो लागू केला नाही. महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वी तो आयोग ल...
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर श्रीकृष्ण आयोग गठित करण्यात आला होता; परंतु तो लागू केला नाही. महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वी तो आयोग लागू करण्याची घोषणा करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. धर्म धोक्यात नाही, तर आरक्षण धोक्यात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
ते म्हणाले की, काँग्रेसने श्रीकृष्ण आयोग गठित केला होता. यात सुनावणी व दोषारोप झाले. या आयोगावर राज्य शासनाने १९९६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पिटिशन दाखल केले.
न्यायालयाने आयोग लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला. हे प्रकरण मध्येच ‘डिसमीस’ केले. मुस्लीम समाजाला खरोखर न्याय देता येत असेल, तर आयोग लागू करण्याचे आश्वासन द्यावे.
बाळापूर येथे झाली बॅगेची तपासणी पोलिसांच्या सहकार्याने सत्ताधाऱ्यांचे पैसे नियोजित स्थळी पोहोचविण्यात येत असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना केला.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ॲड. आंबेडकर हे बाळापूर येथे आले होते. यावेळी हेलिपॅडवर निवडणूक प्रशासनाकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी बॅग तपासणीच्या विषयावर महायुती सरकारवर हल्ला चढविला.
COMMENTS