विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीप...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
दरम्यान सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. तुळस येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक असेल, माझी मुलगी सोनाली माझा राजकीय वारसदार नाही, लवकरच माझा वारसदार ठरेल, असं म्हणत त्यांनी ऐन निवडणुकीत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघातून निवडणुकीच्य रिंगणात उतरवलं आहे. काल दिपक केसरकर यांची सभा पार पडली. या सभेतून दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणा केली होती. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
देशात चुकीची परंपरा झाली आहे, खोटं बोलून नेरेटीव्ह सेट केलं जात आहे. गेल्या 15 वर्षात मी काय काम केलं यावर प्रश्न उपस्थित केलं जात होतं. मी गेल्या 5 वर्षात 2500 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला. उद्धव ठाकरे सावंतवाडीत येऊन काय बोलतात, साईबाबांबद्दल बोलतात. मात्र साईबाबांनी आशीर्वाद दिले म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अन्यथा उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.
नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हाची स्थिती काय होती. त्यावेळी किती मताधिक्य होतं ते जाणून घेण्याची गरज आहे. नारायण राणे यांनी मला पहिल्यांदा आमदार केलं. विधानपरिषदेत आठ वेळा बजेट सादर केलं. मात्र जी युती बाळासाहेबांनी निर्माण केली, ती युती सिंधुदुर्गात मोडण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. बजेट सादर करताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला निधी दिला, मात्र उद्धव ठाकरे आपण निधी दिल्याचं सांगत आहेत. निविदा मिळवण्यासाठी बाऊन्सर घेऊन फिरणारे उमेदवार या मतदारसंघात उभे आहेत, त्यांच्यापासून सावध रहा, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला. जर उद्धव ठाकरे यांना मराठीचा अभिमान होता, तर मराठी संवर्धन करायची कार्यालये मुंबईच्या बाहेर का गेली? ती सर्व कार्यालये मी पुन्हा मी मुंबईमध्ये आणल्याचा दावा त्यांनी केला. तसंच यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली होती.
दरम्यान आज तुळस येथे पत्रकार परिषदेतही त्यांनी, ही आपली शेवटची निवडणूक असेल मात्र माझी मुलगी वारदार असणार नाही. लवकरच माझा राजकीय वारस ठरेल असेल, असं सूचक विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना केसरकर यांनी निवृत्तीचे संकेत दिल्यामुळे चर्चांना इधाण आलं आहे.
COMMENTS