विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार भाजपला एकामागोमाग एक धक्के देत आहेत. समरजीत घाटगे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन मोठे नेते शरद पवारांच्...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार भाजपला एकामागोमाग एक धक्के देत आहेत. समरजीत घाटगे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन मोठे नेते शरद पवारांच्या गळाला लागले, यानंतर आता शरद पवारांनी त्यांचा मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे.
शिवसेनेचा नेता आता शरद पवारांच्या गळाला लागला आहे. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह भाजपवर आरोप केले आहेत. माझे फोन उचलले जात नव्हते, मला अपमानित केलं गेलं, त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचं विजय नाहटा म्हणाले आहेत.
सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ठाण्यात दिल्या जातात, आम्हाला वेठबिगार समजत आहेत. सर्व शाखांची भाडी आम्ही भरतो. पक्ष वाढीसाठी वरिष्ठांकडून कोणतंही सहकार्य मिळालं नाही. सिडको आमच्या भागात असताना औरंगाबादमधील माणूस आमच्या डोक्यावर ठेवता, अशी संतप्त प्रतिक्रिया विजय नाहटा यांनी दिली आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना सिडको महामंडळाचं अध्यक्षपद दिल्याबद्दल विजय नाहटा यांनी नाराजी व्यक्त केली.
विजय नाहटा हे 10 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बेलापूर विधानसभेतून निवडणूक लढण्यासाठी विजय नाहटा इच्छुक आहेत. बेलापूर मतदारसंघात सध्या भाजपच्या मंदा म्हात्रे या आमदार आहेत, पण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी भाजपमध्येच असलेले संदीप नाईक इच्छुक आहेत, त्यामुळे नवी मुंबईमध्ये सध्या नाईक विरुद्ध म्हात्रे संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. मंदा म्हात्रे यांनी जाहीर सभेतून नाईक कुटुंबाला इशारा दिला आहे.
COMMENTS