भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी राज्यात शेतकऱ्यांसह अनेक प्रश्नांवर उत्तम काम केलेले असून हेच काम पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी ...
भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी राज्यात शेतकऱ्यांसह अनेक प्रश्नांवर उत्तम काम केलेले असून हेच काम पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षाचा पर्याय निवडला.
ते सर्व आज राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. त्यामुळे आजपासून तुम्ही आणि मी वेगळे नसून राज्याचा चेहरा बदलण्यासाठी एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
राज्यातील बीआरएसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. यावेळी बीआरएसचे महाराष्ट्र समन्वयक बी. जी. देशमुख, माजी खासदार हरिभाऊ राठोड, नानासाहेब बच्छाव, निखिल देखमुख, बाळासाहेब साळवे, महादेव बनसोडे, रूपेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.
शरद पवार म्हणाले, “आज राज्यात बीआरएस पक्षाने चांगले काम उभे केले आहे. ते सगळे आज राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत असून आगामी काळात आपल्याला सगळ्या समाजातील लोकांना न्याय द्यायचा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे आहे. मात्र, तीन – चार दिवसांनंतर बीआरएस आणि राष्ट्रवादी एकत्र बसून निर्णय घेतील. सगळ्यांकडे जबाबदाऱ्या दिल्या जातील. तुम्हा सगळ्यांचा सन्मान करण्याचे काम माझे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.”
हरिभाऊ राठोड म्हणाले, “शरद पवार ही आज महाराष्ट्राची गरज आहे. तुमची आमची गरज आहे.” बी. जी. देशमुख म्हणाले, “आगामी काळात शरद पवार यांच्या विचारांचे सरकार आपल्याला आणायचे आहे.”
COMMENTS