विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, राज्यात निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये रा...
विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, राज्यात निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात महाविकास आघाडीला आशादायक चित्र असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
सध्या कुठंही गेल तरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले येऊन भेटत आहेत. एकाने निर्णय घेण्याऐवजी सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्याची आवश्यक आहे. सगळ्यांचा विचार करण्याची गरज आहे, जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास सुरू आहे. जयंत पाटील आणि सिनियर लोकांची टीम आहे ते मुलाखती घेतील. आमची आघाडी आहे, आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत. कुणी जागा लढवावी याच्यात एकवाक्यता असणं गरजेचं आहे.जागांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढच्या १० दिवसांत हे सगळं संपेल. त्यानंतर लोकांमध्ये जावं लागेल आणि भूमिका मांडणे सुरू होईल. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा १ तर राष्ट्रवादीचे चार खासदार होते. आता तीस निवडून आले, त्यामुळे वातावरण चांगलं आहे. आम्हाला आशादायक चित्र आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वन नेशन वन इलेक्शनवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही एकत्रित बैठक घेणार आहोत. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, माझं मत आता सांगणे योग्य नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे, यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंजस्याने आरक्षणाचे प्रश्न सोडवायचे असतात, तणाव वाढायचं काही कारण नाही. आपण सगळे भारतीय आहोत, महाराष्ट्राचे घटक आहोत. त्यामुळे सामंजस्य भूमिका जे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकारने देखील लोकांना विश्वासात घेऊन चांगलं वातावरण कसं राहील याची खबरदारी घेतली पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS