राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एकापाठोपाठ एक धक्के देताना दिसत आहेत. पुण्यातील...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एकापाठोपाठ एक धक्के देताना दिसत आहेत. पुण्यातील वडगावशेरी मतदार संघातील भाजपचा बडा नेता शरद पवार यांनी गळाला लावला आहे.
त्यामुळे पुण्यात भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह महादेव पठारे, महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव आणि तीन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. त्यामुळे पुण्यात शरद पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे.
बापूसाहेब पठारे २००९ मध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. मात्र, २०१४ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपचे जगदिश मुळीक विजयी झाले. निवडणुकीच्या कालावधीत झालेल्या गटबाजीमुळे बापूसाहेब पठारेंनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांना संधी मिळेल, पक्षाकडून त्यांना तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती. मात्र, भाजपनं मुळीक यांनाच पुन्हा संधी दिली. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरेंनी पराभव केला.
२०१९ मध्ये बापूसाहेब पठारे यांना भाजपने विधानसभेचे तिकीट दिलं नाही. २०२४ मध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल, असं त्यांना वाटत होतं. पण अजित पवार गटामुळे त्यांची संधी पुन्हा हुकली. वडगावशेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे वडगावशेरीची जागा महायुतीत अजित पवार गटाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेता बापूसाहेब पठारे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं बोललं जातं आहे.
COMMENTS