विधानसभेची निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे....
विधानसभेची निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. जागावाटप आणि मतदारसंघ यावर दोन्ही गटाकडून चर्चा होताना दिसत आहे.
मात्र विधानसभा निवडणूक आपल्याला तिकीट मिळणार नसल्याची शक्यता असल्याने काही नेते पक्षाची साथ सोडत आहेत, तर काही नेते अपक्ष लढण्याची धमकी देत आहेत. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Bachu Kadu claimed that more than half of NCP MLAs including Ajit Pawar will join the Sharad Pawar group)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीपासून सातत्याने दावा केला आहे की, अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील. अजित पवार सत्तेत सामील झाले असले तरी शरद पवारांचा गट त्यांना येऊन मिळेल. राज ठाकरे अनेकदा असा दावा करत असताना बच्चू कडूनीही अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले की, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की, आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील आणि काही दिवसांनी अजित पवारही शरद पवारांसोबत दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेले नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचे आणि कुणाबरोबर राहायचे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे, असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.
लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयावादाबाबत प्रश्न विचारला असता बच्चू कडू म्हणाले की, राज्यात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई तर होणारच. भाजपा म्हणतेय, लाडकी बहीण योजना आम्ही आणली. शिंदे गट म्हणतेय आम्ही आणली आणि अजित पवार यांचा पक्षही म्हणतोय योजना आम्ही आणली. पण ही लाडकी बहीण योजना कुणी आणली? हे त्यानांच ठरवायचं आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी जास्त बोलणं टाळलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विषयांवर टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रीजचा ओपिनिय पोल प्रसिद्ध झाला. या पोलमध्ये अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना ४३ टक्के लोकांनी अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात, असे मत नोंदवले होते. तर ३३ टक्के लोकांनी जाणार नाही आणि २२ टक्के लोकांनी सांशक असल्याचे मत नोंदवले होते. त्यामुळे अजित पवार शरद पवारांसोबत जाणार का? हे येणाऱ्या काळातच समजेल.
COMMENTS