पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ आणि वाई तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात गणिती कै मनोहर राईलकर यांच्या स्मरणार्थ पुण...
पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ आणि वाई तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात गणिती कै मनोहर राईलकर यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्ह्यातील निवडक 60 गणित अध्यापकांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन वाई गणित अध्यापक मंडळाचे सचिव श्री नागेश मोने सर, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी सौ छाया महेंद्रकर मॅडम त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सुनीता राव मॅडम, गोळवलकर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर मॅडम तसेच जिल्हा गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री देविदास शिंदे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. देविदास शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर महेंद्रकर मॅडम व राव मॅडम यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शक श्री नागेश मोने सर यांनी गणितातील अंकांची गंमत त्याचबरोबर गणितातील अनेक क्लिष्ट संकल्पना सहज सोप्या पद्धतीने कशा सांगू शकतो याबाबत अतिशय उत्तम असे मार्गदर्शन केले. भास्कराचार्य प्रतिष्ठानचे डॉक्टर किरण बर्वे यांनी निसर्ग चार भिंतीच्या आत मध्ये आणून अगदी सहज सोप्या पद्धतीने भूमिती कशी शिकवता येईल याबाबतचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर भास्कराचार्य प्रतिष्ठानचे डॉक्टर विनय आचार्य यांनी विभाज्यता व मूळ संख्या याबाबतच्या अनेक संकल्पना आपल्या मार्गदर्शनामध्ये स्पष्ट केल्या. प्रशिक्षणार्थींना त्यांच्यासाठी आणि वर्गातील मुलांसाठी उपयोगी पडेल असे लिखित साहित्य देण्यात आले.
साध्या आणि वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या बाबींचा अभ्यास गणिती कसा करतात आणि त्यातून अत्यंत महत्वाचे आणि खूपदा रंजक असे गुणधर्म कसे शोधतात त्याची माहिती देणारे कागद,घडीपत्रक आणि श्रीनिवास रामानुजन यांच्या संदर्भातील माहिती आणि त्यांचे गणित या संदर्भातील पुस्तिका देण्यात आली.
वाई तालुका गणित अध्यापक मंडळाच्या पुस्तकांची माहिती देण्यात आल्याने ,शिक्षकांना ,वर्गात गणित शिकविताना उपयोगी पडेल असे कितीतरी साहित्य किती मोलाचे आहे त्याची कल्पना आली.
या उपक्रमासाठी शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे,संशोधन परिषदेचे अधिकारी काठमोरे साहेब आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले..
या वर्गानंतर झालेल्या ,पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या बैठकीत ,या वर्षी डिसेंबर महिन्यात ,पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या ,माध्यमिक शाळांतील ,गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे निदान एक दिवसाचे अधिवेशन घेण्यासंदर्भात विचार झाला.
समारोपप्रसंगी कै मनोहर राईलकर यांच्या पत्नी मीरा राईलकर या सहकुटुंब उपस्थित होत्या. याप्रसंगी जितेंद्र त्रिवेदी, मंगला सपकाळे, प्रशांत टेमकर व भगवान पांडेकर यांनी कार्यशाळेसंबंधी आपली मते मांडली. पुणे शहर गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटेकर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन पुणे जिल्हा गणित अध्यापक संघाचे सचिव श्री सचिन धनवट यांनी केले.
COMMENTS