नारायणगाव दि.१२:- जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते, जुन्नर विधानसभेचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी माजी आमदार व...
नारायणगाव दि.१२:- जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते, जुन्नर विधानसभेचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी माजी आमदार वल्लभ बेनके यांचे रविवारी (दि.११) रात्री १०.३० वा. दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बेनके, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अमोल बेनके, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, युवा नेते अमित बेनके, सुना, नातवंडे असा असा परिवार आहे.
आज होणार अंत्यसंस्कार
माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे. आज सोमवारी दुपारी १२ पर्यंत नारायणगाव येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे मूळ गाव असलेल्या हिवरे बुद्रुक येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
हिवरे बुद्रूक या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बेनके यांनी विज्ञान शाखेची पदवी मिळविली. धरणग्रस्त शेतकरी, रोटरी क्लबचे अध्यक्ष ते आमदार अशी वाटचाल त्यांनी केली. कौटुंबिक राजकीय वारसा नसूनही त्यांनी मातब्बर प्रतिस्पर्थ्यांना शह देत विक्रमी यश मिळविले. कुशल संघटक, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा, प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू नेता असा लौकिक त्यांनी कमावला. अनेक वेळा मंत्रिपदाची संधी हुकूनही त्यांचे कार्य कमी झाले नाही. शेती, जलसंधारण, शिक्षण, सहकार, उद्योग, पर्यटन अशा क्षेत्रांना चालना देण्याचे कार्य त्यांनी केले. आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी ज्ञानदा शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळी येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. त्यांनी अनेक विकासकामे केली.
"माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्ट- कांसाठी लढणारे, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता हरपला:- उपमुख्यमंत्री अजित पवार
COMMENTS