पुणे, आकुर्डी (ता.२७) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आकुर्डी या विद्यालयामध्ये 'मराठी राज...
पुणे, आकुर्डी (ता.२७) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आकुर्डी या विद्यालयामध्ये 'मराठी राजभाषा दिन' काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी साहित्यिक व कवयित्री मा. प्रतिमा काळे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यादेवता सरस्वती आणि ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व
दीपप्रज्वलन करून करण्यात आली. वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने दिलेल्या विषयांवर काव्यवाचन सादर केले.
स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली.पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी 'आई', सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी 'निसर्ग',तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी 'गुरु आणि शिक्षण', या विषयांवर वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या. कवितांच्या माध्यमातून विद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी साहित्य जगतातील अनेक कवी आणि कवयित्री यांचा परिचय मिळाला तसेच मराठी व्यापक साहित्याची माहिती देखील मिळाली. कविता ऐकून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या काळे मॅडम यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना मराठी साहित्याचे महत्त्व आपल्या भाषणातून पटवून दिले. याप्रसंगी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत म्हणाल्या, "विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करून स्वतःच्या सृजनशीलतेला वाव दिला पाहिजे व लोप पावत चाललेली आपली मातृभाषा ही जपली पाहिजे." स्पर्धेचे परीक्षण मा.प्रतिमा काळे व विद्यालयाच्या प्राचार्या मा.प्रिती दबडे यांनी केले. स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे- *गट पाचवी व सहावीमधून १.भुवनेश्वरी गांगुर्डे,२. उर्वी नाईक,३.अवनी नगरकर, उत्तेजनार्थ- प्रथमेश व्हावळ, आमीन सिद्दिकी, *गट सहावी व सातवीमधून १.प्रांजली पाडळे २.तनिष्का बिरादार ३.उज्वल सिंग, उत्तेजनार्थ- शिववर्धन मोहिते , पूर्वा ठोसर * गट नववी व अकरावीमधून १.तनिष्का पांढरकर २.पूर्वा गाढवे ३.अपूर्वा धुमाळ.सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्या प्रतिमा काळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी तनिष्का पांढरकर आणि ईश्वरी इंदलकर यांनी केले व आभार प्रदर्शन शिक्षिका शिल्पा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या माननीय प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक विभागाने केले होते.
COMMENTS