जुन्नर: जुन्नरमध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवा अंतर्गत आयोजित द्राक्ष महोत्सव २०२४ मध्ये पिंपळवंडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार आणि निर्...
जुन्नर: जुन्नरमध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवा अंतर्गत आयोजित द्राक्ष महोत्सव २०२४ मध्ये पिंपळवंडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार आणि निर्यातदार श्री प्रकाश भाऊसाहेब वाघ यांना "द्राक्ष किंग २०२४" हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासोबत रोख रक्कम २१०००/- , सन्मानचिन्ह, शाल आणि साडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.
पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ अंतर्गत जुन्नर पर्यटन विकास संस्था, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "द्राक्ष महोत्सव २०२४" चे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भाजपा नेत्या आशाताई बुचके, नगराध्यक्ष शाम पांडे, सहसंचालक स्वप्निल कापडणीस, पर्यटन विभाग पुणे च्या उपसंचालिका शमा पवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, कृषीभूषण जितेंद्र बिडवई, आदिनाथ चव्हाण, कृषी अधिकारी बापूसाहेब रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवामध्ये द्राक्ष , बेदाणे व द्राक्ष ज्यूस स्टॉल, द्राक्ष बागा भेटी आणि द्राक्ष पीक स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. जुन्नरच्या मातीतील द्राक्षे ही गोड, मधुर व रसाळ असून, निर्यात क्षम दर्जाची आहेत. द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या स्पर्धेचे मागील सहा वर्षांपासून आयोजन करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक कृषिभूषण जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.
या स्पर्धेत जुन्नर आंबेगाव तालुक्यातील एकूण ४५ द्राक्ष उत्पादकांनी सहभाग घेतला होता. या सर्व बागांची तज्ञांमार्फत प्रत्यक्ष बागांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली. प्रामुख्याने शेतकऱ्यांचा अनुभव, पिकवलेली जात, बागेचे व्यवस्थापन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब, मार्केटिंग साठी केलेले प्रयत्न तसेच इतर शेतकऱ्यांसाठी केलेले प्रेरणात्मक कार्य या सर्व बाबींचा विचार करून यावर्षीचा "द्राक्ष किंग २०२४" हा मानाचा पुरस्कार पिंपळवंडी तालुका जुन्नर येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार व निर्यातदार श्री प्रकाश भाऊसाहेब वाघ यांना मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला. तसेच तालुक्यातील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार निहार राजेश कुटे रा. बोरी , राजेश शिवाजी गावडे रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव, संदीप किसन खोकराळे रा. हिवरे तर्फे नारायणगाव व समीर विश्वनाथ जाधव रा. गोळेगाव यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ पुरस्कार रोख रक्कम ११,०००/- सन्मानचिन्ह व साडी देऊन संपत्नीक सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ राहुल घाडगे व प्राध्यापक राधाकृष्ण गायकवाड यांनी केले.
COMMENTS