ओतूर - संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य, ओतूर (पुणे) , नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे, वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई आणि माय मराठी महारा...
ओतूर - संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य, ओतूर (पुणे) , नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे, वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई आणि माय मराठी महाराष्ट्र राज्य अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, दि.२१/०८/२०२३ पहिल्या श्रावण सोमवार निमित्त कवठे येमाई देवस्थान ओतूर येथे पहिले श्रावणधारा कवीसंमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे दोन सत्रात नियोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवाजी महाराज ,संत तुकाराम महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शासकीय राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पहिल्या सत्रात पंचक्रोशीतील ज्येष्ठ कवींची चार पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्यामध्ये राजेश साबळे,ओतूरकर लिखित गुज काव्यसंग्रह, उल्हास गाढवे लिखित रामकृष्ण हरी काव्यसंग्रह आणि दावल ठिकेकर लिखित मराठी कवी व लेखक आणि मराठी संत व संत कवी. यामध्ये हभप.लोकशाहीर भीमराव ठोंगिरे यांनी रचलेला कार्यक्रम पत्रिकेचा पोवाडा आकर्षणाचा विषय ठरला.
या कार्यक्रमाचे उदघाटन सुधाकर घोडेकर (ज्येष्ठ साहित्यिक पुणे) यांनी केले.तर अध्यक्षस्थानी जालिंदर डोंगरे (ज्येष्ठ साहित्यिक खोडद ) होते. प्रमुख पाहुणे म्हणून हभप.गंगाराम महाराज डुंबरे (अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद जुन्नर तालुका), इंजि.शिवाजी चाळक (संस्थापक शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडी ), सुरेश डुंबरे (ज्येष्ठ चित्रकार मुंबई), डॉ.रश्मी घोलप (ज्येष्ठ साहित्यिका ओतूर आणि संजय नलावडे (ज्येष्ठ स्तंभलेखक मुंबई).
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना..
साहित्य म्हणजे नेमकं काय? हे सांगताना ज्येष्ठ कवी जालिंदर डोंगरे..म्हणाले...
साहित्य म्हणजे नेमकं काय तर मला असे वाटते की साहित्य म्हणजे भाषेच्या माध्यमातून विचार व भावनांचे सुंदर मिश्रण शब्द रूपाने तयार करून वाचकांच्या हृदयापर्यंत जे घेऊन जाते.. आणि झिरपत ठेवते अशी अविरत चालणारी प्रक्रिया म्हणजे साहित्य होय....याने काय होते.. तर भाषेच्या माधूर्याची एकदा गोडी लागली की ती मधुरता आपल्याला अनुभवाच्या वरच्या पातळीपर्यंत घेऊन जाते..मागील शतकांच्या शेवटी शेवटी लेखकांमधील काही बंधने बदलली गेली व एक प्रकारे त्यामध्ये पोकळी आली.. विशेषतः कवितांच्या बाबतीत सांगायचे झाले तर वृत्तछंद लय यामधून मुक्तछंद कविता असे प्रकार आढळून येऊ लागले.. लेखनात नाना कल्पनांचा कल्पनाविलास अंतर्भाव असल्याचे दिसून येत असते
सभोवताली घडणाऱ्या गोष्टीचे पडसाद लेखक कवीच्या मनावर तत्परतेने परिणाम होतो व त्याचे प्रतिबिंब त्याच्या लेखांमध्ये दिसून येते आजूबाजूचा कोलाहल, विविध निरीक्षणे, जीवनाच्या अनेक अंगावर टिप्पणी, नात्यागोत्यातले संबंध, निसर्गामधील विविधता अशा अनेक कितीतरी गोष्टी लेखक कवींच्या लेखनात येऊ लागले आहेत. यामध्ये विशेषतः एखादा लेखक कवी असेल संवेदनाशील मनाचा असेल तर त्याचे भावविश्व, विचार विस्तारविश्व, सदृश्य असते.. तो जाणिवांनी प्रगल्भ त्याचे लेखन सर्वांग सुंदर होते व वाचकालाही त्या अलौकिक सौंदर्याचा अनोखा अविष्कार पाहायला मिळतो..
ज्येष्ठ कवी उल्हास गाढवे यांचा रामकृष्ण हरी हा काव्यसंग्रह संत वाङ्ममयाबद्दल याबद्दल जिज्ञासा व ओढ निर्माण करणारा वाटतो. कवी स्वतः शेती काम करतात.. आपल्याला सुचलेल्या कल्पनांना, भावनांना विचारांना शब्दबद्ध करतो आहे. अशी माणसं झाडांशी बोलतात.. पाखरांशी बोलतात.. जनावरांची बोलतात.. पिकांच्या पानाबरोबर हितगुज करतात त्याचीच ती कविता होते.....
कवी दावल ठिकेकर यांनी आपल्या मराठी लेखक व कवी आणि महाराष्ट्रातील संत व संत कवी. उपरोक्त पुस्तकात आद्यकवी मुकुंदराज संत बाळूमामा यांच्यापर्यंत अल्प माहिती असलेल्या लोकांना या संतांच्या विचार परिचय व काव्य अभंगरचना समजण्यास मोठी मदत होते..
राजेश साबळे,ओतूरकर यांच्या गुज या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आपल्या मनात असलेल्या भाव भवनाचे चित्रण विविध कवितांमधून मनाच्या आतल्या कप्प्यातील संवेदना, भावना सांगितलेल्या आहेत. मनातलं तेवढं आपण कसं सांगायचं या सर्वसामान्य माणसांना पडणाऱ्या प्रश्नाला उत्तर म्हणून या सर्वच रचना वाचकांशी हितगुज करतात असे वाटते..
या तिन्ही ज्येष्ठ कवींच्या पुस्तकांचे आज प्रकाशन होते आहे. आपल्या सर्वांच्या वतीने या तिन्ही कवींना मी सुयश चिंततो..
तर दुसऱ्या सत्रात उत्तम सदाकाळ (ज्येष्ठ साहित्यिक मढ, जुन्नर) यांच्या अध्यक्षतेखाली ओतूर पंचक्रोशीतील कवींचे श्रावणधारा कविसंमेलन अगदी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.विजय लोंढे (प्रसिद्ध कवी,निवेदक व व्याख्याते पुणे), कैवारीकार विलास हाडवळे (प्रसिद्ध कवी राजुरी) उपस्थित होते.यामध्ये पंचक्रोशीतील कवींनी काव्यवाचन करून उपस्थितांची दाद मिळविली.त्यामध्ये ऍड.जयराम तांबे,ललिता तांबे, महेश पंधरे ,सरिता कलढोणे , अर्जुन हाडवळे, हिरामण माळवे, मकरंद वांगणेकर, मुकेश विशे ,सविता जंगम ,शालेय विद्यार्थिनी कु.मयुरी दाभाडे आणि आश्विनी गाढवे यांनी कविता सादर केल्या.
वरील दोन्ही सत्राचे सूत्रसंचालन संजय गवांदे (कवी,निवेदक,व्याख्याते मुंबई) यांनी केले.
या कार्यक्रमाकरिता विशेष उपस्थिती मोहित ढमाले (जि.प.सदस्य), प्रशांत डुंबरे (सरपंच ग्रा.पं. ओतूर), देविदास तांबे (सामाजिक कार्यकर्ते ओतूर), धनंजय डुंबरे (माजी सरपंच ) , डॉ.प्रविण डुंबरे , कारभारी औटी (सामाजिक कार्यकर्ते), गजानन राखोंडे (उपाध्यक्ष संत गाडगे महाराज विचारमंच महा.राज्य) यांची लाभली.तर स्वागत प्रमुख म्हणून कवठे येमाई देवस्थानचे जयसिंग डुंबरे (अध्यक्ष) आणि धोंडीभाऊ मोरे (सचिव) उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजेश साबळे,ओतूरकर (अध्यक्ष - नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे), संजय गवांदे (माय मराठी अध्यापक संघ), नागेश हुलावळे (संस्थापक वर्ल्ड व्हिजन संस्था ) आणि रणजित पवार, संस्थापक - संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य अधिक परिश्रम घेतले.
COMMENTS