बीड: अल्पवयीन मुलीला तिच्या बाहेरगावी लग्नाला गेलेल्या आई वडिलांकडे नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिघांनी दुचाकीवरून अपहरण केले. सदर प्रकरणी ति...
बीड: अल्पवयीन मुलीला तिच्या बाहेरगावी लग्नाला गेलेल्या आई वडिलांकडे नेऊन सोडण्याच्या बहाण्याने तिघांनी दुचाकीवरून अपहरण केले. सदर प्रकरणी तिघांवर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील (नाव गाव गोपनीय) यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. या मध्ये एका मुलीचे लग्न झाले आहे. तर दुसरी अल्पवयीन आहे. २३ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे पती हे फिर्यादीच्या मेहुण्याच्या मुलाच्या लग्नाला धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे गेले होते. लग्नाचा कार्यक्रम असल्याने त्यांनी तेथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी २४ मार्च रोजी जायचे ठरवले. त्या नंतर ते सकाळी घरी आले तेव्हा त्यांची मुलगी (नाव गाव गोपनीय) त्यांना दिसली नाही. मुलाला विचारले तेव्हा मुलाने सांगितले की, आपल्याच गावातील सतीश खंडागळे, प्रकाश, खंडागळे आणि मनोहर भांगे हे तिघे रात्री ०९ वा.सु. दुचाकीवर आले. आणि सतीश खंडागळे हा फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला म्हणाला की, तूझ्या आई वडिलांनी कळंब येथे लग्नाला बोलावले आहे. चल आपण जाऊ असे म्हणुन तिला घेऊन गेला.
मुलीचा सगळीकडे शोध घेतला पण ती काही मिळून आली नाही. तेव्हा या तिघांनी माझ्या मुलीला 'तूझ्या आई वडिलांनी तुला लग्नाला बोलावले आहे' असे म्हणून पळवून नेले आहे. तेव्हा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार मुलीच्या आईने दिली. त्या नुसार सतीश खंडागळे, प्रकाश खंडागळे, आणि मनोहर भांगे या तिघांवर केज पोलिस ठाण्यात भा.दं.सं. कलम ३४ आणि ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS