सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, बेल्हे व जुन्नर पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "वैभवशाली जुन्नरचे पर्यटन" या विषयावर आधारित विद्यापीठ स्तरीय तीन दिवसीय शिबिर नुकतेच संपन्न झाले.
शिबिरातील विद्यार्थ्यांना जुन्नर चे वैभवशाली पर्यटन जवळून पाहता यावे यासाठी संकुलाच्या माध्यमातून पर्यटन दौऱ्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला, अंबा अंबालिका लेणी, नाणेघाट, कुकडेश्वर मंदिर या ठिकाणी करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना सिद्धार्थ कसबे यांनी गाईड म्हणून मार्गदर्शन केले.
जुन्नर तालुक्याला वैभवशाली पर्यटनाची परंपरा असून ऐतिहासिक आणि नैसर्गिक सृष्टीने नटलेल्या सौंदर्याचा खजिना असल्याचे गाईड सिद्धार्थ कसबे यांनी सांगितले.
शिवनेरी किल्ल्यावर पोहचल्यानंतर महादरवाजा पासून ते सर्व सात दरवाजे, त्यावर असलेल्या शरभ शिल्प, दरवाजांची रचना, बांधकाम शैली, त्यांचा इतिहास याबाबत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. पुढे शिवाई देवीचे मूळ मंदिर त्यामागील इतिहास व तेथे कोरलेली लेणी यांची माहिती दिली.
अंबरखाना, जन्मस्थळ, त्याठिकाणी असलेली त्याकाळची खापराची पाईप लाईन, कारंजे, बदामीतलाव त्यातील दगडांचा वापर कुठे केला या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली. नंतर अंबा अंबालिका लेणी, भूत लेणी, भीमाशंकर लेणी यांचा असलेला दोन हजार वर्षांपूर्वी चा इतिहास त्याबद्द्लची माहिती सांगितली.
विशेष म्हणजे एकाच दिवसात विद्यार्थी प्राचीन धम्मलिपीची अक्षरे ओळखायला व वाचायला शिकली. नंतर नाणेघाट मध्ये गेल्यावर नाणेघाटाच्या निर्मितीचा इतिहास, तेथील रांजण, लेणी, लेण्यांमध्ये कोरलेल्या प्राकृत भाषा व धम्म लिपी चे वाचन करून माहिती दिली. नाणेघाट च्या कड्यावरून मुलांनी सुर्यास्त होतानाच्या दृश्याचा आनंद घेतला. आणि शेवटी एक हजार वर्षांपूर्वी चा इतिहास असलेल्या पांडवकालीन कुकडेश्वर मंदिर येथे जाऊन मंदिराची व परिसराची माहिती दिली.
निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा व वसा जपूया असा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. जबाबदार पर्यटन हि काळाची गरज असून तरुणांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असे सिद्धार्थ कसबे यांनी सांगितले.
या शिबिरासाठी समर्थ शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी विपुल नवले, दिनेश जाधव, अमोल काळे, तेजश्री गुंजाळ, गौरी भोर व जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हाडवळे, अध्यक्ष यश मस्करे यांचे विशेष योगदान व सहकार्य मिळाले आहे.
COMMENTS