तुळजापूर : सोलापूर पुणे रोडवर भिमानगर गावच्या शिवारातील प्राची हॉटेलसमोर स्पीड ब्रेकरवर ट्रकचा मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास अपघात...
तुळजापूर : सोलापूर पुणे रोडवर भिमानगर गावच्या शिवारातील प्राची हॉटेलसमोर स्पीड ब्रेकरवर ट्रकचा मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास अपघात होऊन त्यात विनोद भोसले हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे.
गंधोरा (ता. तुळजापूर) येथील विनोद बलभीम भोसले (वय २८) हे सोमवारी (ता. २७) दुपारी ०४:०० वा. सुमारास मित्र किरण म्हेत्रे (रा. सास्तुर ता. लोहारा) यांच्यासोबत पुण्याला फरशीची ट्रक खाली करण्यासाठी जात असताना अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक नितीन शिंदे हा फरार झाला असून, मयताचा भाऊ दत्तात्रय भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, ट्रक क्र. एमएच - १६ सीसी ५८५९ चा ट्रकचालक नितीन शिंदे यास रोडवर असलेला डिव्हायडर न दिसल्याने त्याने स्पीड ब्रेकर जवळ आल्याचे पाहून अचानक ब्रेक मारल्याने त्यात ट्रकमध्ये भरलेली फरशी पुढे सरकून सदर फरशी ट्रकच्या केबिनमध्ये आली. केबिनमध्ये विनोद भोसले यांच्या बरोबरच क्लिनर आणि अजून एक व्यक्ती असे एकूण तिघेजण होते त्या मध्ये विनोद बलभीम भोसले (वय २८) हे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. त्या नंतर ट्रकचा क्लिनर आणि सोबत असलेला व्यक्ती यांना खाजगी रुग्णवाहिकेतून इंदापूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. ट्रकचालक नितीन परशुराम शिंदे (रा. पठारवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा तेथून घाबरून पसार झाला आहे.
या घटनेनंतर फिर्यादी मयताचा भाऊ दत्तात्रय बलभीम भोसले यांनी टेंभुर्णी पोलिस स्टेशन गाठून अपघातातील ट्रक क्र. एमएच - १६ सीसी ५८५९ चा चालक नितीन परशुराम शिंदे (रा. पठारवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध तक्रार दिली. विनोद भोसले यांच्या मागे आई, वडील, तीन भाऊ, एक बहिण, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मुळ गावी गंधोरा येथे साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद भोसले यांच्या अशा अकाली जाण्याने गंधोरा सह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भोसले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
COMMENTS