नागपूरः रेल्वेस्थानकावर पोटच्या दोन मुलींना सोडून प्रियकरासोबत निघून गेलेली महिला सहा दिवसांनंतर पुन्हा परतली आहे. मुली हव्या आहेत म्हणून रे...
नागपूरः रेल्वेस्थानकावर पोटच्या दोन मुलींना सोडून प्रियकरासोबत निघून गेलेली महिला सहा दिवसांनंतर पुन्हा परतली आहे. मुली हव्या आहेत म्हणून रेल्वे पोलिस आणि वरदान संस्था संचालित रेल्वे चाइल्डलाइनकडे आता विनंती करत आहे.
पण, प्रियकरासाठी पोटच्या मुलींना सोडून गेलेल्या प्रियकरानेही तिला सोडल्यानंतर आता मुलींसाठी रडू लागली आहे.
बालकल्याण समितीच्या आदेशानंतरच मुलींना देता येत असल्याचे सांगत महिलेला परत पाठविण्यात आले. दोन्ही मुलींना श्रद्धानंद अनाथालयात ठेवण्यात आले. येथे मुलींची योग्य काळजी घेतली जात आहे. एका मुलीचे वय चार वर्षे तर दुसरी केवळ दोन वर्षांची आहे.
रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चिमुकलीचा रडण्याचा आवाज तेथील दुकानदाराने २५ मेच्या रात्री ऐकला होता. मुलीजवळ कुणीच दिसत नसल्याने चाइल्डलाइनच्या कार्यालयात त्या मुलीला नेण्यात आले. परिसरात शोध घेतल्यानंतर आणखी एक मुलगी तिथे आढळली. सीसीटीव्ही तपासले असता अर्ध्या तासापूर्वी एक महिला मुलींना सोडून एका पुरुषाच्या मागे ती रेल्वेत बसून निघून गेली असल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी तपास केला. इटारसी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून सीसीटीव्हीत आढळलेल्या महिलेचा शोध घेतला. मात्र, ती महिला सापडली नव्हती. आपले नावही नीट सांगता येत नसलेल्या या मुलींना चाइल्डलाइन, रेल्वे पोलिसांनी जेवायला दिले, चांगले कपडे दिले. त्यांना धीर दिला. त्या दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना श्रद्धानंद अनाथालयात ठेवण्यात आले आहे.
रेल्वे पोलिसांनी महिलेला विचारले असताना तिने घडलेला प्रकार सांगितला. ती म्हणाली, 'माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे. लग्न करण्याचे आश्वासन एका पुरुषाने मला दिले. मात्र, या मुलींना तात्पुरते इथेच सोड, अशी अट घातली होती. लग्न झाल्यानंतर आपण त्यांना घेऊन जाऊ, असे तो म्हणाला होता. यानंतर दोन्ही मुलींना रेल्वेस्थानकावर सोडून त्याच्यासोबत गेले होते. मात्र, त्या पुरुषांच्या कुटुंबीयांनी स्वीकारले नसल्याने पुन्हा नागपुरात आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS