संपादक- प्रा. सतिश शिंदे. सुरूवातीला मी सांगू इच्छितो की , हे माझे विचार जरी असले तरी तुम्ही वाचल्यानंतर मला समजणार आहे की , मी किती बरोबर...
संपादक- प्रा. सतिश शिंदे.
सुरूवातीला मी सांगू इच्छितो की, हे माझे विचार जरी असले तरी तुम्ही वाचल्यानंतर मला समजणार आहे की, मी किती बरोबर लिहिले आहे. त्यामुळे विचार हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात मात्र त्या विचारांवर सर्वांनी विचार केला पाहिजे हे सांगणारा विचार आज मला तरी हा योग्य वाटला म्हणून लिहीला………..
आज काल लहाण मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या हातात न विसरता मोबाईल पहायला मिळत असतो. तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना प्रत्येकजण मोबाईलच्या एका क्लिकवर जगातली पहिली खबर पहात असतो. एक काळ असा होता की, गावातील शाळेचे गुरूजी जो पेपर आणायचे तो वाचून गावात पहिली खबर कळायची आज मात्र या सर्वच गोष्टी बदलल्या आहेत. आणि बदल हा काळानुसार व्हायलाच पाहिजे. यात मात्र दुमत नाही. पण प्रश्न असा आहे की, या मोबाईलमुळे खर तर तंत्रज्ञानाने प्रत्येकाला प्रत्येकाबरोबर बोलण्याची व जवळ आणण्याची जी ताकद दिली. ती बाकी जबरदस्त आहे. याच जोरावर व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा यावर मैत्री करण्याला एक वेगळीच ताकद आली.
आज फेसबुकवर प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या नावाने अकाऊंट आहेत. त्यातही मग प्रत्येकाची पोस्ट वेगळी, फोटो टाकण्याची जी क्रेझ आहे ती वेगळीच याला कुठलीही तोड नाही. दिवसभराच्या आपल्या पोस्टला लाईक किती मिळाल्या हे ही तितकच अट्रॅक्शन वेगळचं, नाही मिळाल्या तर दिवसभर त्यातच गुंतून राहणं. हे प्रत्येकजण करतो.
पूर्वीच्या काळाची आणि आताच्या काळाची बरोबरी करणे म्हणजे कालसुसंगती होणार नाही. तरीही तो काळ समाधानी, सुखी होता अस जुनी जाणती लोक सांगतात, त्याचा अनुभव आपल्यातीलही काही लोकांनी घेतला असेलच. तर सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, आज प्रत्येकजण धावपळीच्या जगात वावरतोय कोणालाही कोणाशी बोलायला, बसायलाही वेळ नाही, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कामात गुंतलेला आहे. तरीदेखील या मोबाईलच्या माध्यमातून सकाळी व संध्याकाळी न विसरता प्रत्येकजण मेसेज करून हाय हेल्लो करूनच झोपतात.
शहरातील व्यक्ती गावच्या व्यक्तीबरोबर मैत्री करून जिव्हाळ्याने गप्पा मारत असते. याचा हा एक सकारात्मक पैलू पहायला मिळतो. मात्र आज लहाण मुले मोबाईलमधील विविध गेम्समुळे मोबाईलच्या शिवाय राहत नाही. त्यामुळे लहाण मुलांमध्ये मोबाईलचे एक प्रकारे व्यसन लागलेले दिसते. पाच ते सहा वर्षाच्या कालखंडामध्ये या मोबाईल वापरणाऱ्यांचे प्रमाण हे शंभर टक्के झाले आहे. यात तिळमात्र शंका नाही. मात्र एक बाजू सर्वांनी पडताळून पाहिली तर आज प्रत्येकजण मोबाईलचा गुलाम झालेला दिसत आहे. मोबाईल हातात नसल्यामुळे काहींना तर आपला जीवच नसल्याची भावना वाटते.
का? होत आहे अस, आपल्या सर्वांच्या आजोबा पंजोबांच्या काळात गावाच्या पारावर दहा बारा माणसं गप्पा गोष्टी करायच्या, एकमेकाची विचारपूस ही आपुलकीने भेटून व्हायची आज मात्र त्या भेटी आणि गप्पागोष्टी या व्हाट्सअप, फेसबुकने घेतल्या आहेत. याचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
परंतू त्या वेळी जो जिव्हाळा, मैत्री होती ती आता पहायला मिळत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि माणूस आपल्याच आविर्भावात राहू लागला, ना कुणाची चिंता ना कुणाची भेट फक्त नाद लागला या मोबाईलचा.
आज शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रत्येक मुलाकडे मोबाईल आहे, मी म्हणणार नाही की, त्यांनी वापरू नये मात्र या पाच ते सहा वर्षामध्ये हजारोंनी बातम्या ऐकायला मिळाल्या की, याची मुलगी त्याने पळवून नेली, याला जबाबदार कोण तंत्रज्ञान जवळ बाळगणे आज गरज आहे, मात्र त्याला काही मर्यादा असतील पण या मर्यादा प्रत्येक जण मोडून टाकत आहे.
आज प्रत्येकाला प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आहे, त्यात कुणी इतिहास, गणित, मानसशास्त्र, अजूनही इतर विषय या प्रत्येकात एखादी व्यक्ती निपूण आहे. परंतु यातही आपले तंत्रज्ञान कसे हाताळायचे याचे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पातळीवर ठरवत असतो.
मी हा विषय मांडण्याचे कारण एवढेच की, आज मोबाईलच्या वापरामुळे तरूणाई फारच चंगळवादाकडे धाव घेत आहे, याला कुणीच नाकारू शकत नाही. यावर तोडगा म्हणून फक्त वापर हा एका मर्यादेच्या पुरता ठेवला पाहिजे.
अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, खूण, दरोडा, चोरी, अपहरण, अशा बातम्यांनी आपल्या सर्वांची सकाळ उजाडते. विचार करायला भाग पाडणाऱ्या आज घटना घडत आहेत.
या गोष्टींचा
विचार करण्याइतपत मी मोठा नाही मात्र तुम्ही विचार करून पहा की, नक्की काय आहे हा प्रकार.
COMMENTS