पुणेः आंबेगाव-शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने वाघाळे ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घालून सदस्यांना धमकावण्यास सु...
पुणेः आंबेगाव-शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने वाघाळे ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घालून सदस्यांना धमकावण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या धमकीमुळे माजी सरपंचाच्या पतीने आत्महत्येचे पाऊल उचलले होते.
पण, ग्रामस्थांमुळे पुढील संकट टळले असून, संबंधित कार्यकर्त्याच्या दहशतीला नागरिक कंटाळले आहेत, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका ग्रामपंचायत सदस्याने दिली.
वाघाळे (ता. शिरूर) ग्रामपंचायत सरपंचपदाची नऊ मार्च रोजी निवडणूक आहे. वाघाळे ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी संबंधित नेता मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आहे. विकास सोसायटीवर जातीने लक्ष घालूनही सत्ता गमवावी लागल्यामुळे स्वतःच्या वर्चस्वाची लढाई निर्माण झाली आहे. काही करून वाघाळे गावची ग्रामपंचायत आपल्या हातात ठेवण्यासाठी आणि स्वतःचे वर्चस्व दाखवण्यासाठी नको-नको त्या मार्गांचा अवलंब केला जात आहे.
वाघाळे गावच्या माजी सरपंचाच्या घरी मोटार पाठवून त्यांना दुसरीकडे घेऊन जाण्यात आले होते. शिवाय, त्यांच्या घराबाहेर 'गुंड' ठेवल्यामुळे संबंधित कुटुंब मोठ्या प्रमाणात दहशतीखाली आहे. पैसा आणि सत्तेच्या गैरवापरामुळे वाघाळे गावातील नागरिकसुद्धा घाबरले आहेत. याबाबत आवाज उठवला अथवा पोलिसांकडे तक्रार केली तरी काही होणार नाही, यामुळे नागरिक मुग गिळून गप्प आहेत, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका ग्रामपंचायत सदस्याने दिली.
'राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने थेट फोन वरून धमकी दिल्यामुळे माजी संरपंचाच्या पतीने गावासमोरच औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुदैवाने ग्रामस्थांमुळे अनर्थ टळला आहे. वाघाळे गावातील ग्रामस्थ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन संबंधित नेत्या विरोधात तक्रार करणार आहेत. तोपर्यंत दहशतीखाली असलेल्या कुटुंबावर लक्ष ठेवून आहोत. कारण, राजकारणामुळे कोणताही अनर्थ घडायला नको आहे,' अशी माहिती वाघाळे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश थोरात यांनी दिली.
COMMENTS