पुणे : पुण्यातील एका तीन वर्षांच्या चिमुकलीचे भीक मागण्यासाठी अपहरण केले आणि चिमुकलीला श्रीगोंदा येथे नेण्यात आले होते. या घटनेची तक्रार दाख...
पुणे : पुण्यातील एका तीन वर्षांच्या चिमुकलीचे भीक मागण्यासाठी अपहरण केले आणि चिमुकलीला श्रीगोंदा येथे नेण्यात आले होते. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्ही आणि पिशवीच्या नावावरून आरोपींचा शोध घेतला.
कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिच्या ताब्यातून चिमुकलीची सुखरुप सुटका केली आहे.
उषा नामदेव चव्हाण (वय 40, रा. कापसे वस्ती, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. उषा ही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तब्बल पाच दिवस 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि हातातील पिशवीच्या नावावरून पुणे पोलिसांनी थेट महिलेचे घर गाठले आणि अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 23 वर्षांची महिला फुगे विक्रीचे काम करत असून, 23 मे रोजी दुपारी दीड वाजता ढोले पाटील रोडवरील एका रिक्षात झोपली होती. त्यावेळी तिच्या 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले होते. तिने दोन दिवस तिचा शोध घेतल्यानंतर मुलगी मिळाली नाही. यानंतर तिने 25 मे रोजी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी 5 दिवसांनी श्रीगोंदा येथून उषा चव्हाण हिला ताब्यात घेतले.
उषा चव्हाण हिला दोन मुले व दोन मुली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लग्नात तिने 30 हजार रुपये हुंडा घेतला होता. त्यांच्या समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. या कारणासाठी ती लहान मुलीला पळवून नेऊन तिला भिक्षा मागण्यासाठी लावणे तसेच तिचे लग्न करताना हुंडा घेता यावा, यासाठी पळवून आणल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS