पुणे: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील विनायक भोसले यांनी केंद्रीय नागरी परीक्षा (यूपीएससी) परीक्षेत ३६६ वी रैंक मिळवून यशाला गवसणी घातली आ...
पुणे: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील विनायक भोसले यांनी केंद्रीय नागरी परीक्षा (यूपीएससी) परीक्षेत ३६६ वी रैंक मिळवून यशाला गवसणी घातली आहे. सातत्याने अभ्यास करूनही तब्बल आठ वर्षे अपयशाने पाठ सोडली नाही.
मात्र, तरीही निराश व हताश न होता, सातत्याने प्रयत्न करून यशाला गवसणी घातली आहे.
केंद्रीय नागरी परीक्षाचा निकाल सोमवारी (ता. ३०) जाहीर झाला. यामध्ये विनायक गोपाळ भोसले (मूळ रा. विसापूर, ता. श्रीगोंदा, जि. नगर, सध्या शिक्रापूर, पुणे) हा अधिकारी झाल्याचे कळले आणि मित्रांनी डोक्यावरच घेतले. विनायक गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात राहून तयारी करत होता. विशेष म्हणजे, त्याने कधीही कोणताही क्लास लावला नाही. स्वयंअभ्यास करत त्याने हे यश खेचून आणले आहे. त्याच्या रँकवरून त्याला सनदी अधिकारी किंवा आयपीएस ही पोस्ट मिळू शकते.
विनायकचे वडील हे सार्वजनिक बांधकाम खात्यात मिस्तरी होते. ते विनायकला म्हणत की, देशासाठी काहीतरी कर, गोरगरिबांची सेवा कर. वडिलांचे निधन २०११ मध्ये झालेले असताना, त्यांचे स्वप्न पूर्ण करायला विनायक पुण्यात आला आणि अभ्यासाला लागला. दरम्यान, पैशांचीही गरज पडायची मात्र, मित्रांनी विनायकला पैशांचा पुरवठा केला, पण त्याला मागे फिरू दिले नाही. विनायकनेही अभ्यासात सातत्य ठेवत यश खेचून आणले आहे. विनायकला गणेश हांडे, डॉ. शशिकांत सोरटे, गणेश पवार, सांख्यिकी सेवेतील श्रीधर धुमाळ, आयपीएस चिन्मय पंडित, दीक्षा लवटे आदींनी मदत केली आहे.
'विद्यार्थ्यांनी आपल्या सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवत, आईवडिलांच्या कष्टाचे चीज करावे. आयुष्यात चढ-उतार येतात. पण, त्यावेळी निराश न होता सातत्याने त्याला प्रयत्न करत राहावे. यामध्ये स्वयंप्रेरणा महत्त्वाची आहे, तसेच सेवेत आल्यावर मी सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी मी सातत्याने झटत राहीन', असे विनायक भोसले यांनी सांगितले.
COMMENTS