शिरूरः पुणे ते नगर रोडलगतच्या गावातील मारुती सुझुकी इको गाड्यांचे सायलेन्सर चोरुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश के...
शिरूरः पुणे ते नगर रोडलगतच्या गावातील मारुती सुझुकी इको गाड्यांचे सायलेन्सर चोरुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, टोळीच्या म्होरक्यास अटक केली आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मारुती इको कारचे सायलेन्सर चोरीचे अनेक प्रकार वाढले होते. पुणे ते अहमदनगर हायवे लगतच्या शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, परीसरातील मारुती सुझुकी कंपनीच्या इको कारचे सायलेन्सर चोरीचे प्रमाण वाढले होते. अशा चोऱ्या करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
सायलेन्सर चोरीचे घडलेल्या गुन्ह्यांचा घटनाक्रम लक्षात घेत, प्रथम चोरी शिरूर परिसरातून सुरू होऊन कोरेगाव भीमा परिसरात शेवटची चोरी झाली होती. परिसरातील सीसीटीव्ही चेक करत चोरटे हे अहमदनगर जिल्ह्यातील असण्याची दाट शक्यता वाढली. त्या अनुषंगाने तपास पथकाने तपास करत असताना पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ गावातील शाहनुर मुनेर शेख याचे गॅरेज असून तो त्याचे साथीदारांसह सायलेन्सर चोरीचे गुन्हे करत आहे, अशी बातमी मिळाली. त्याचा शोध चालू असताना तो होंडा शाईन मोटार सायकलवर शिरूर बायपास रोडने पुणे बाजूकडे जात आहे, अशी बातमी मिळाली असता, त्यास पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली देत, त्याचे साथीदार समीर रशीद सय्यद व आकाश संजय भंडलकर दोघे (रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर) यांचे मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. चोरलेला मुद्देमाल हा शहानुर शेख व समीर सय्यद असे दोघेजण पुढे माजीद खान (रा. पुणे) यास विक्री केल्याचे सांगितले आहे. शहानूर मुनीर शेख (वय 22 वर्षे, रा. राळेगण थेरपाळ ता.पारनेर जि. अहमदनगर) याचे टोळीने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो. निरीक्षक अशोक शेळके, सहा पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहा. फौज. तुषार पंदारे, पो.हवा. जनार्दन शेळके, पो. हवा. राजू मोमीन, पो.ना. मंगेश थिगळे, पो.ना. योगेश नागरगोजे यांनी केली आहे.
COMMENTS