प्रयागराज (उत्तर प्रदेश): प्रयागराजमधील (Prayagraj) गंगापार (Gangapar) येथे आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील 5 जणांवर धारदार शस...
प्रयागराज (उत्तर प्रदेश): प्रयागराजमधील (Prayagraj) गंगापार (Gangapar) येथे आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील 5 जणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून पाच जणांची हत्या करण्यात आली.
घटनेनंतर घराला आग ही लावण्यात आली. थरवई (Tharwai police) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवराजपूर (Shivrajpur village) गावात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
राज कुमार (वय 55), कुसुम देवी (वय 53), मनीषा कुमारी (वय 25) अपंग मुलगी सविता (वय 23), 2 वर्षांचा मुलगा अशी मृतांची नावे आहेत. वीट आणि दगडाने हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतांचं घर पेटवून दिले. त्याचवेळी एका 5 वर्षाच्या मुलीवरही हल्ला झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत साक्षी ही 5 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. तिला प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य घराच्या व्हरांड्यात झोपले होते. त्याचबरोबर घरातून धूरही निघत असल्याचे आढळून आले आहे.
एडीजी प्रयागराज झोन प्रेम प्रकाश यांनी सांगितले की, प्राथमिक दर्शनी असे दिसते आहे की, दरोडेखोरांनी ही घटना लुटण्याच्या उद्देशाने केली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी घराला आग लावल्याचे समजते. पोलिस प्रत्येक पैलूंचा बारकाईने तपास करत आहेत. फॉरेन्सिक आणि श्वानपथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
COMMENTS